नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दारूच्या नशेत लिफ्ट न दिल्याने टोळक्याने चारचाकीतील दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नांदूर जत्रा लिंकरोड भागात घडली. या घटनेत वजनी हत्यार डोक्यात मारण्यात आल्याने चालकासह अन्य एक जण जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित रमेश कांबळे (मुळ रा.हर्नुल ता.चांदवड हल्ली नांदूर जत्रा लिंकरोड) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. कांबळे व त्याचा मित्र गणेश पाटोळे हे दोघे सोमवारी (दि.१४) रात्री साडे नऊच्या सुमारास एमएच १ एचएच १२४७ या चारचाकीतून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. नांदूरनाक्याकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने जात असतांना स्वराज हॉटेल समोर रस्त्यात उभ्या असलेल्या चार जणांनी लिफ्ट साठी हात दाखविल्याने कांबळे यांनी आपले वाहन थांबविले होते.
वाहनात बसत असतांना संशयित मद्यपान केले असल्याचे लक्षात आल्याने त्यांना वाहनात बसण्यास मज्जाव केला असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने कांबळे व पाटोळे यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत दोघांच्या डोक्यावर वजनी वस्तू मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.