नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुकेनकरनगर भागात पाण्याच्या खड्यात करंट उतरल्याने बांधकाम साईटवरील ५४ वर्षीय वॉचमनचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रकांत सोमनाथ मोंढे (रा.तमारा हॉटेल मागे,बागड प्रॉपर्टी सुकेनकरनगर) असे मृत वॉचमनचे नाव आहे. मोंढे कुटुंबिय सुकेनकरनगर भागात रोहित कुंडलवाल यांच्या सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकाम साईटवर वास्तव्यास आहे. वॉचमन म्हणून राहणारे मोंढे शुक्रवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास बांधकाम साईटवर पाणी मारण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले होते.
पाण्याच्या खड्यात असलेली मोटार सुरू न झाल्याने ते पाण्यात उतरले असता ही घटना घडली. मोटारीतील बिघाडामुळे पाण्यात करंट उतरल्याचा अंदाज बांधला जात असून कुटुंबियांनी त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढून बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालायात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.