नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिणे असलेले पाकिट रिक्षा प्रवासात लांबविणा-या दोघांना पोलीसांनी गजाआड केले आहे. या घटनेत संशयिताचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोईन मेहबुब शहा व वसीम लतीफ शहा (रा.दोघे म्हाडा वसाहत वडाळागाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत भुषण श्रीधरराव घोडके (६२ रा.साईधाम सोसा.निशांत गार्डन पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. घोडके सराफ व्यावसायीक असून ते गेल्या रविवारी (दि.१३) सकाळी सराफ बाजारात आले होते. वेगवेगळया दुकानामधून घडवणीसाठी दागिणे घेवून ते रिक्षातून आपल्या घराकडे निघाले असता ही घटना घडली होती.
रविवार कारंजा येथील अन्नपूर्णा खानावळ येथून ते तीन प्रवासी असलेल्या अॅटोरिक्षात बसले होते. अन्य प्रवाश्यांनी त्यांना मध्यभागी बसवून त्यांच्या खिशातील सुमारे २ लाख ५ हजार २०० रूपये किमतीच्या सोन्याच्या लगड असलेले पाकिट लांबविले होते. दाटीवाटी करीत पुढे सरकण्यास लावून ही चोरी करण्यात आली होती. त्यानंतर भामट्यांनी घोडके यांना व्हिक्टोरीया पुलावर बळजबरीने उतरून देत पोबारा केल्याने ही घटना निदर्शनास आली होती. घोडके यांनी तात्काळ पोलीसात धाव घेतल्याने दोघे भामटे पोलीसांच्या हाती लागले असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.