नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील चार लाखाची रोकड हातोहात लांबविली. ही घटना सीबीएस बसस्थानकात घडली. जायखेडा ता.सटाणा येथील शेतकरी दांम्पत्य मुलास भेटण्यासाठी शहरात आले होते. परतीच्या प्रवासास लागण्यापूर्वी सोबत आणलेल्या कांदा विक्रीच्या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तबसुम बाओद्दीन शेख (५० रा.मोसम मोहल्ला जायखेडा ता.सटाणा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख दांम्पत्य शहरात राहणा-या मुलास भेटण्यासाठी आले होते. कांदा विक्रीची रक्कम ते सोबत घेवून आले होते. मुलास भेटून दांम्पत्य परतीच्या प्रवासासाठी सोमवारी (दि.९) दुपारी जुने सीबीएस येथे आले असता ही घटना घडली.
वसई नंदूरबार या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तबसुम शेख यांच्या पर्समधील रोकडवर डल्ला मारला. बसमध्ये बसल्यावर पर्सची चेन उघडी दिसल्याने चोरीचा हा प्रकार समोर आला. दाम्पत्याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरक्षक सुरवाडे करीत आहेत. दरम्यान मोठ्या कष्ठाने मिळालेली मोठी रक्कम भामट्यांनी लांबविल्याने शेख दांम्पत्यावर आर्थिक आपत्ती ओढावली असून या घटनेने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरी लागली आहे.