नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पनीर बनविण्याच्या मशिन खरेदी विक्रीत एका बेरोजगारास गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची रक्कम सुपूर्द करूनही मशिन न पुरविण्यात आल्याने तरूणाने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मशिन पुरवठा करणाºया व्यावसायीकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम कराड (रा.मोरवाडी,सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मशिन पुरवठादाराचे नाव आहे. याबाबत निवेश भिमाशंकर आहेर (रा.सिहस्थनगर,सिडको) या युवकाने फिर्याद दिली आहे. निवेश आहेर बेरोजगार असून त्याने पनिर बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आयडीएफसी बँकेने त्यास कर्ज पुरवठा करण्यास होकार दिल्याने त्याने गेल्या वर्षी संशयिताची भेट घेतली असता ही फसवणुक झाली.
मोरवाडी व्यायाम शाळा भागात असलेल्या विराज इंटरप्राईजेस कंपनी या नावाच्या दुकानात जावून त्याने प्रोप्रायटर विक्रम कराड यांची भेट घेत सुमारे ७ लाख ७४५.९५ रूपयांचे पनीर मशिनचे कोटेशन मिळविले होते. या कोटेशनच्या माध्यमातून आयडीएफसी बँकेने कर्ज मंजूर करून संशयिताच्या नावे धनादेश काढला होता. कर्ज रकमेचा धनादेश सुपूर्द करून वर्ष उलटले मात्र संशयिताने अद्याप मशिनचा पुरवठा केला नाही. तगादा लावूनही मशिन पदरात पडत नसतांनाच आहेर यांच्या पाठीमागे बँकेच्या कर्जाच्या हप्त्याचा ससेमिरा लागल्याने त्याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.