नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तिडके कॉलनीत वाहन पार्किंगच्या वादातून पतीस मारहाण करीत शेजा-यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या घटनेत संशयितांनी पीडितेच्या घरी घरकाम करणा-या महिलांनाही अश्लिल शिवीगाळ केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परिक्षीत जोशी, उमेश जोशी, पौर्णिमा जोशी गिरीश आनंद व जतीन आनंद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित व पीडित कुटुंबिय एकाच भागातील रहिवासी असून त्यांच्यात वाहन पार्क करण्याच्या कारणातून वाद आहे. मंगळवारी (दि.८) रात्री पीडितेचा पती आपले वाहन पार्क करीत असतांना संशयितांनी त्याच्याशी वाद घालत त्यास मारहाण केली.
पार्किंगमध्ये आरडाओरड झाल्याने पीडिता व तिच्या घरी घरकाम करणाºया महिला मदतीसाठी धावून गेल्या असता संशयितांनी त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. यावेळी संशयित परिक्षीत जोशी, गिरीश आनंद व जतीन आनंद यांनी महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.