नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा व सत्र न्यायालयाने वाहतूक पोलीस धक्काबुक्की करणा-या आरोपीस एक वर्ष कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१९ मध्ये गंगापूररोडवरील जेहान सर्कल भागात ही घटना घडली होती. अंकुश निवृत्ती कराड (३७ रा.शिशीर अपा.रूतुराज पार्क नाईक मळा,सिन्नर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात वाहतूक शाखेचे कर्मचारी गोरख पांडूरंग फड यांनी फिर्याद दिली होती. फड ६ फेब्रुवारी २०१९ रोजी वाहतूक सप्ताह निमित्त भोसला कॉलेज भागात बेशिस्तांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली होती. भरधाव जाणा-या आरोपी कड याचे वाहन अडविल्याने हा वाद झाला होता. संतप्त कड याने फड यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली तसेच त्यांना ढकलून दिले होते. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.आर.साबळे यांनी केला. हा खटला कोर्ट क्र.९ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.आय.लोकवाणी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड.अपर्णा पाटील, जगदिश सोनवणे व त्र्यंबकवाला यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला एक वर्ष साधा कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.