नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात महिला व मुलींपाठोपाठ अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, सोमवारी (दि.१४) वेगवेगळया भागात राहणारे दोन मुले बेपत्ता झाले आहेत. सदर मुलांना कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पोलीस दप्तरी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा अल्पवयीन मुलगा सोमवार पासून बेपत्ता आहे. घरात कुणासही काही एक न सांगता सायंकाळी पासून तो अचानक गायब झाला असून त्याचे कुणी तरी अपहरण केले असल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरा प्रकार जेलरोड भागात घडला. फ्लॉवर स्कूल पाठीमागे राहणारा पंधरा वर्षीय मुलगा सोमवारी दुपारी घरात कुणासही काही एक न सांगता घरातून निघून गेला आहे. सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने कुटूंबियाने पोलीसात धाव घेतली असून कुणी तरी त्याला फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी भागात भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर रामदास पगारे (३४ रा. अश्विनी कॉलनी,जयप्रकाशनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. पगारे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास एक वर्षासाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.१५) तो आपल्या घर परिसरात मिळून आला. याबाबत अमलदार सागर आडणे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
दहशत माजविणा-यावर पोलीसांनी केली कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धारदार तलवारीचा धाक दाखवत दहशत माजविणा-या एकावर पोलीसांनी कारवाई केली. टाकळीरोडवरील म्हाडा वसाहत भागात पोलीसांनी ही कारवाई केली असून संशयिताच्या ताब्यातील तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमरान शब्बीर गौरी (४९ रा.म्हाडा बिल्डीगं,गिताईनगर टाकळीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तलवारधारीचे नाव आहे. इमरान गौरी हा तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१५) रात्री धाव घेत संशिताच्या मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यात लोखंडी तलावर मिळून आली असून याबाबत अंमलदार निलेश विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जुंद्रे करीत आहेत.