नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पाण्यात बुडून दोघांचा नुकताच मृत्यू झाल्याची दोन घटना शहर व परिसरातील वेगवेगळया भागात घडल्या. यात एका २७ वर्षीय विवाहीतेसह ४४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. माहेरी आलेल्या महिलेचा जेवण आटोपून फेरफटका मारत असतांना नाल्यात पाय घसरून पडल्याने तर सदर व्यक्ती गोदाघाट परिसरातील पाण्यात तरंगतांना मृत अवस्थेत मिळून आला. याबाबत आडगाव आणि पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी ज्ञानेश्वर जाधव (रा.दामोदर चौक,यशवंतनगर पाथर्डीफाटा) ही विवाहीता ओढा ता.जि.नाशिक येथील निकम वस्तीवर आपल्या माहेरी गेली होती. रात्री जेवण आटोपून ती फेर फटका मारत असतांना ही घटना घडली. घराजवळील नाल्यावरील लोखंडी पूलावरून ती पायी जात असतांना अचानक पाय घसरून ती नाल्यात पडली होती. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबियांनी धाव घेत पाण्याबाहेर काढले. चुलत भाऊ पवन निकम यांनी रात्री तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार बाळासाहेब जाधव करीत आहेत.
दुसरी घटना गोदाघाट परिसरातील रामकुंड येथे घडली. सुखविंदर सिंग कलसी (४४ रा.श्री गणेश अपा.शिवाजीनगर) यांचा मृतदेह सोमवारी (दि.१४) रात्री लक्ष्मणकुंड भागात मिळून आला. परिसरातील नागरीकांना पाण्यात तरंगतांना अनोळखी इसम आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस व अग्निशमन दलाने धाव घेत सदर व्यक्तीस पाण्याबाहेर काढले असता खिशातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. बेशुध्द अवस्थेत सदर इसमास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंमलदार गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.