नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारमध्ये बसलेल्या भाच्यावर मामा समक्ष टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत भाचा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तीन जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार जाधव व त्याचे दोन अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
याबाबत विशाल रविंद्र निकम (२७ रा.विजयनगर,सिडको) या युवकाने फिर्याद दिली आहे. निकम सोमवारी (दि.१४) मामा हर्षल खैरणार यांच्यासमवेत औदयोगीक वसाहतीतील निकिता मंगल कार्यालय भागात गेला होता. रात्री एजन्सीचे ऑफिस मधील काम आटोपून मामाभाचे घराकडे निघाले असता ही घटना घडली. निकम आपल्या मामाच्या चारचाकीत बसत असतांना दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत गाडी खाली खेचले.
यावेळी टोळक्याने दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून निकम यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. मामा गाडीतून उतरून वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच संशयितांपैकी एकाने निकम याच्या डोक्यावर धारदार कोयता मारून जखमी केले आहे. मामा खैरणार यांनी तात्काळ भाचा निकम यास नजीकच्या वक्रतुंड हॉस्पिटल येथे दाखल केल्याने अनर्थ टळला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.