नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा व सत्र न्यायालयाने तरूणाचा खून केल्याप्रकरणी सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला केल्याची घटना १३ जून २०१८ रोजी पेठरोडवरील फुलेनगर भागात घडली होती. या घटनेत मृताचे दोन मित्रही जखमी झाले होते. हा खटला कोर्ट क्र . ८ चे न्या. जे.एम. दळवी यांच्या समोर चालला.
जयराम नामदेव गायकवाड (४४ रा.लक्ष्मणनगर,तेलंगवाडी),दशरथ नामदेव गायकवाड (२४), श्रीराम नामदेव गायकवाड (३६),सुरज जयराम गायकवाड (१९),अंबिका अर्जुन पवार (२८ रा.सर्व वैशालीनगर पेठरोड), संदिप चंद्रकांत पवार (२५ रा.अश्वमेधनगर,पेठरोड) व राहूल चंद्रकांत पवार(१९ रा.देवळालीगाव बाजारपट्टी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सुनिल सुखलाल गुंजाळ (२१ रा.वैशालीनगर पेठरोड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी सुनिल गुंजाळ त्याचा भाऊ अनिल गुंजाळ,सागर माने व दिपक कोरडे आदी मित्र १३ जून २०१८ रोजी फुलेनगर परिसरातील लक्ष्मननगर येथील कै.लक्ष्मण जाधव यांच्या नावाच्या बोर्डाजवळ गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली होती. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने गुंजाळ बंधूसह त्यांच्या दोन मित्रावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत अनिल गुंजाळ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता तर माने आणि गोराडे गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खून, प्राणघातक हल्ला व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक विजय ढमाळ यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.८ चे न्या.जे.एस.दळवी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अड.एस.एस.गोरवाडकर व डॉ.सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्षीपुराव्यास अनुसरून सर्व आरोपींनी वेगवेगळ््या कलमान्वये दोषी ठरवत जन्मठेप व एकत्रीत ३० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.