नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामपंचायत सदस्याने एका ६० वर्षीय सेवानिवृत्तास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फार्म हाऊसला दरवाजे व खिडक्या बसविण्याचे काम करून देतो अशी बतावणी करीत भामट्याने पावणे दोन लाख रूपये उकळले असून, अडिच वर्ष उलटूनही काम न केल्याने वृध्दाने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश लहांगे (३९ रा.उजणी ता.वाडा जि.पालघर) असे संशयित ठकबाजाचे नाव असून तो उजणी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. याबाबत मिलींद धर्माजी जाधव (६० रा.गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव सेवानिवृत्त असून त्यांचे पालघर जिह्यात शेतजमिन आहे. या ठिकाणी फार्म हाऊसचे बांधकाम करण्यात आले असून, बांधकामास दारे व खिडक्या बसविण्याची ग्वाही परिचीत ग्रा.प.सदस्य असलेल्या लहांगे यांनी दिली होती.
त्यानुसार जाधव यांनी सन.२०२१ मध्ये वेळोवेळी ऑनलाईन १ लाख ७२ हजाराची रक्कम संशयितास अदा केली मात्र संशयिताने काम केले नाही. अडिच वर्ष उलटूनही काम व पैसे परत न केल्याने अखेर जाधव यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार दिपक गोंडे करीत आहे.