नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यावसायीक गुंतवणुकीत मोठ्या परताव्याची हमी देत एकाने आपल्या मित्रांनाच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. भरधाव परताव्याचे आमिष दाखविण्यात आल्याने या व्यवसायत मित्रांनी एकत्रीत येत गुंतवणुक केली. त्यानंतर साडे ५१ लाखाची परतफेड करीत संशयिताने २३ लाख रूपये देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर परशुराम रामोळे (रा.बजरंगनगर,आनंदवली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अविनाश युवराज जाधव (२९ रा.आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार एकमेकांचे मित्र असून गेल्या वर्षी जाधव यांना भागीदारीतील व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यात आले होते. या व्यवसायात ७४ लाख ३६ हजार ९५० रूपयांची गुंतवणुक करण्यात आली होती. त्यातील ५१ लाख ५३ हजार ८५० रूपयांची संबधितानी परतफेड करण्यात आली. मात्र २२ लाख ८५ हजार १०० रूपयांच्या परतफेड न करता संशयिताने जाधव यांच्यासह त्यांच्या मित्रांना विश्वासात घेवून चांगल्या परताव्यासह रक्कम देण्याची ग्वाही दिली होती.
मात्र वर्ष उलटूनही रकमेचा परतावा केला नाही त्यामुळे जाधव यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करून परतावा करण्यास टाळाटाळ केल्याने जाधव यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.