नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चौरंग पाट विक्रेत्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. उधारीच्या ९०० रूपयांच्या रक्कमेसाठी भामट्याने थेट पीडितेच्या पतीस संपादीत केलेले छायाचित्र पाठविल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण (रा.बिंदायका जयपूर,राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या पतीने पोलीसात धाव घेतले आहे. पीडित दांम्पत्याने संशयिताकडून चौरग व पाट खरेदी केले होते. ठरल्यानुसार उरलेली ९०० रूपयांची रोकड दांम्पत्याने संशयितास अदा न केल्याने त्याने हे कृत्य केले. भामट्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक महिलेचे छायाचित्र मिळविले.
या छायाचित्रांना एडीट करून अश्लिल बनवित त्याने शनिवारी (दि.१२) रात्री पीडितेच्या पतीच्या व्हॉटसअपवर पाठविल्याने हा प्रकार समोर आला. उधारीचे ९०० रूपये तात्काळ पाठवा अन्यथा पत्नीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके करीत आहेत.