नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगरटाकळी रोड भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने चालकास जीवे मारण्याची धमकी देत कारची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेत कारची मागील आणि पुढची काच फोडून नुकसान करण्यात आले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल खरणारे (२० रा.साई प्लाझा बिल्डींग,रामदास स्वामी नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत विलास दत्तात्रेय मोरे (५६ रा.हरिदर्शन सोसा.रामदास स्वामी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आणि तक्रारदार एकाच परिसरातील रहिवासी असून त्यांच्यात जुना वाद आहे. मोरे रविवारी (दि.१३) मुंबई येथे जाण्यासाठी सोसायटीच्या पार्किगमधून आपली एमएच ४८ एडब्ल्यू ६९०४ ही कार काढत असताना ही घटना घडली.
मद्याच्या नशेत लोखंडी रॉड घेवून आलेल्या संशयिताने जुन्या भांडणाची कुरापत काढून मोरे यांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने तुला आता जीवंतच ठेवत नाही असे म्हणत प्रथम कारची पाठीमागील काच फोडली. भेदरलेल्या मोरे यांनी दार न उघडता कारमध्ये बसूनच आरडाओरड सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. संशयिताने पुढील काच फोडून त्यांना गाडी खाली खेचण्याचा प्रयत्न केला मात्र आरडाओरड ऐकुण परिसरातील नागरीकांनी धाव घेतल्याने संशयिताने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.