नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चेतनानगर भागात बंगल्याच्या आवारातून तस्करांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार घडला. या घटनेत सुमारे २० ते २२ वर्ष जुने झाड भामट्यांनी कापून नेले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय अच्युत देशपांडे (रा.पवमान बंगला,चेतना नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशपांडे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्ती पदावर कार्यरत असून शनिवारी (दि.१२) रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात बेकायदा प्रवेश करून चंदनाचे झाड कापून नेले. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी ५० हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोल पंप भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २५ हजाराच्या रोकडसह सोन्याची रूद्राक्ष माळ व डेबीट कार्ड चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक सदाशिव देवकुटे (रा.आई अपा.आकाश पेट्रोलपंपामागे समृध्दी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. देवकुटे कुटूंबिय शनिवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून हॉलमधील टेबलावर ठेवलेली सोन्याची रूद्राक्षमाळ रोकड व बँक आॅफ इंडियाचे डेबिटकार्ड असा सुमारे ४७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.