नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पर्यटनानिमित्त शहरात आलेल्या महिलेच्या गळयातील दागिणे दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. तपोवनात रिक्षात बसत असतांना ही घटना घडली असून यात सुमारे सव्वा लाखाचे अलंकार भामट्यांनी पळविले आहेत. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोल्लू कनकम्मा नागेश्वरराव (६३ रा.सुर्यपट तेलंगना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नागेश्वरराव या पर्यटनानिमित्त शहरात आल्या आहेत. शुक्रवारी (दि.११) पंचवटीतील देवदर्शन करून त्या तपोवनात गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तपोवनाताली लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शन घेवून त्या पंचवटीत परतण्यासाठी रिक्षात बसत असतांना ही घटना घडली. मंदिरासमोर रिक्षात बसत असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र व सोनसाखळी असे सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे अलंकार हिसकावून नेले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
भावास दवाखान्यात शिरून मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भावकिच्या वादातून जखमी झालेल्या भावास एकाने दवाखान्यात शिरून मारहाण केल्याची घटना बिटको रूग्णालयात घडली. या घटनेत पतीच्या बचावासाठी धावून गेलेल्या भावजयीचा विनयभंग करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळकृष्ण सोनवणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीस सिन्नर तालूक्यात भावकीच्या वादात मारहाण करण्यात आली. त्यामुळे पतीस बिटको रूग्णालयातील दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.१०) मध्यरात्री पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना संशयिताने तेथे येवून भावास मारहाण करीत बेडवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीता आपल्या पतीच्या मदतीस धावून गेली असता संशयित दिराने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.