नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पार्ट टाईम जॉबसाठी गुंतवणुक करण्यास भाग पाडून भामट्यांनी शहातील एका युवकास तब्बल बारा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य मदन भावसार (रा.सातपूर कॉलनी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. भावसार इंटरनेटवर पार्ट टाईम जॉबची पाहणी करीत असतांना त्यांच्याशी गेल्या ६ सप्टेंबर रोजी ५७३५०७१११५४७ या व्हॉटसअॅप मोबाईलधारकांनी संपर्क साधला होता. यानंतर भावसार यास ए १ एमेझॉन पार्ट टाईम जॉब या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. व्हॉटसअॅप आणि टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांना पार्ट टाईम जॉबसाठी गुंतवणुक केल्यास अल्पावधीत मोठ्या फायद्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. भावसार गळाला लागताच त्यांना अवघ्या चार दिवसात विविध बँक खात्यात तब्बल ११ लाख ८५ हजार रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले.
महिना उलटूनही मोबदला पदरात न पडल्याने भावसार यांनी संबधीतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होवू शकला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच भावसार यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.