नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्रॅच मॅनेजरने मोबाईलची परस्पर विक्री करीत आपल्या मालकाच्या विश्वासाला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घनेत महागड्या मोबाईल खरेदी विक्रीचा लेखा जोखा न ठेवता भामट्याने २१ लाख रूपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय संजय बोरसे (रा.श्रमिकनगर,सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत संदिप शंकरराव शिमगेकर (रा.नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. शिमगेकर यांची एस.एस.मोबाईल नावाची फर्म असून या फर्मच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळय़ा भागात मोबाईल खरेदी विक्रीचा व्यवसाय उभा राहिला आहे. गंगापूर शाखेत हा अपहार झाला.
बँच मॅनेजर असलेल्या संशयिताने १४ ऑगष्ट ते १० ऑक्टोबर दरम्यान वेगवेगळय़ा कंपनीचे मोबाईल आणि टिव्ही विक्री करून सुमारे २० लाख ८८ हजार ७५ रूपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.