नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्हेरीफिकेशनच्या बहाण्याने गोपनिय माहिती मिळवित क्रेडिट कार्डचा परस्पर वापर करून भामट्यांनी एका व्यावसायीकास तीन लाखाला गंडा घातला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय हेमंत अमृतकार (रा.सेवाकुंजजवळ पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अमृतकार यांचे दिंडोरीरोडवरील पंचवटी पोलीस ठाण्यासमोर बालाजी एन्टरप्रायझेस नावाचे दुकान असून, गेल्या शुक्रवारी (दि.४) सकाळच्या सुमारास ते आपला व्यवसाय सांभाळत असताना ही घटना घडली. भामट्यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करीत त्यांचा विश्वास संपादन केला.
यावेळी संशयिताने क्रेडिट कार्डसाठी व्हेरिफीकेशन करावयाचे असल्याची बतावणी करीत अमतकर यांची गोपनिय माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे त्यांच्या आरबीएल आणि बँक ऑफ बडोदा या बँकेच्या क्रेडीट कार्डचा परस्पर वापर करून ३ लाख ९ हजार १३२ रूपयांना गंडा घातला. अधिक तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत.