नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबई पोलीस आणि ईडी कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करत एकाने नाशिक शहरातील ७१ वर्षीय वृध्दास गंडा घातला. मनी लॅण्डींग प्रकरणात समावेश असल्याची धमकी देत तब्बल २० लाख उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, या वृध्दाशी गेल्या १ ऑक्टोंबरला या भामट्यांनी संपर्क साधला होता. प्रदिप सामंत नावाच्या इसमाने ९२७८५५०९७२, ७६३६८८७८९३ व ९९५७०२४१५८ या मोबाईल क्रमांकवरून संपर्क साधात वृध्दास मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी केली होती. नरेश गोयल याच्याशी तुमच्या मोबाईलवरून वारंवार संपर्क झाल्याचे तपासात पुढे आले असून त्याच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तुमचाही सहभाग आहे. त्यामुळे तुमचे सर्व आर्थिक तपशिल व स्थावर मालमत्तांची माहिती आम्हास द्यावी लागेल.
त्याबाबत ईडी अधिकारी आकांक्षा अग्रवाल यांच्याशी संबधिताने बोलणे करून दिले होते. अग्रवाल या महिलेने कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यातील जमापूंजी वृध्दास अन्य खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले असून, या फसवणुकीत भेदरलेल्या वृध्दाने २० लाख ११ हजार १११ रूपयांची रक्कम संबधीतांनी सांगितलेल्या बँक खात्यात वर्ग केली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.