नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी वाढली असून व्यावसायीकांकडून राजरोसपणे खंडणी उकळली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. वेगवेगळया भागात घडलेल्या घटनांमध्ये धारदार शस्त्राचा धाक दाखवित भामट्यांनी दोन व्यावसायीकांकडे हप्त्याची मागणी करीत थेट लुटमार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस दप्तरी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार सुरज बद्रीनारायण कहाणे (रा.तेलीगल्ली,संताजी मंगल कार्यालयाजवळ दे.गाव ) यांनी दिली आहे. कहाणे बुधवारी (दि.९) आपल्या घरी असतांना मनिष उर्फ टिक्कू वाघोले व रोशन लवटे या संशयितांनी त्यांना गाठले. दारू सेवन करण्यासाठी पैशांची मागणी करीत संशयितांना त्यांच्या मानेला कोयता लावून गावात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा पाच हजार रूपये द्यावे लागतील तसेच दरमहा हप्ता दिला नाही तर तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. यावेळी संशयितांनी बळजबरीने कहाणे यांच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले. तसेच जातांना घरासमोर शिवीगाळ करीत परिसरात कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तर रविसिंग प्रल्हादसिंग वघेल (२८ रा.फर्नाडीसवाडी,जयभवानीरोड) या पाणीपुरी विक्रेत्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डावखरवाडी येथील सुमन हॉस्पिटल भागात व्यवसाय करीत असतांना संजय उर्फ मॉडेल बेद (रा.फर्नांडीसवाडी,ना.रोड) याने गाठून ५०० रूपये हप्ता घेतला होता. बुधवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास संशयिताने व्यवसाय करीत असतांना या भागात पाणी विक्रीचा व्यवसाय करायचा असल्यास दररोज शंभर याप्रमाणे हप्ता द्यावा लागेल. तसेच आठ महिन्यांपासून येथे व्यवसाय करीत असल्याने २४ हजार रूपये दे असे म्हणत संशयिताने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्याने कोयता मानेला लावून जीवे मारण्याची धमकी देवून खिशातील साडे तीन हजार रूपयांची रोकड काढून घेतली. दरम्यान याप्रसंगी संशयिताने उपस्थित ग्राहकांना शिवीगाळ करीत कोणी मध्ये आले तर कापून टाकेल अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही घटनांबाबत उपनगर पोलीस ठाण्यात जबरीलुटीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे उपनिरीक्षक सोनवणे व सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत.