नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दांडीया खेळण्यासाठी गेलेल्या मुलीस आपटी बॉम्ब घेऊन देण्याचा बहाणा करून एकाने विनयभंग केला. तर दुस-या घटनेत दुचाकीस्वाराने अश्लिल वर्तन करीत दोघा मैत्रीणींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
जुने नाशिक येथील अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि.८) रात्री परिसरातील गुरूइच्छा मित्रमंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या दांडीया रासमध्ये गेली होती. या ठिकाणी तिला महेश रघूनाथ वांद्रे (४७ रा शितळा देवी पाठीमागे अमरधामरोड,काझीगडी) या संशयिाने गाठले. मुलीस आपटी बॉम्ब घेवून देण्याचा बहाणा करीत संशयिताने तिला नजीकच्या संत गाडगे बाबा मठ भागात घेवून जात विनयभंग केला. मुलीने कशी बशी सुटका करून घेत घर गाठल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पीडितेच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.
दुसरा प्रकार पंडीत कॉलनीत भागात घडला. एमएच १५ जेपी ०६६१ या स्कुटीवर प्रवास करणा-या माथेफिरूने शिकवणीसाठी रस्त्याने पायी जाणा-या मुलींना आवाज देत अश्लिल चाळे केले. हा प्रकार गेल्या शुक्रवारी (दि.४) पंडीत कॉलनी समोरील रोडवर घडला. दोघा मैत्रीणींना क्लास गाठून शिक्षकांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.