नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुर्वनगर भागात अपघातात मदत केल्याने मायलेकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत गैरमार्गाने जमाव जमवून टोळक्याने दगड विटांसह रॉडने मारहाण केल्याने मायलेक जखमी झाले आहे. याप्रकरणी गंगापर पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेसह तिच्या दहा ते पंधरा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण राजेंद्र पाटील (रा.स्टुडिओ अपा.मोतीवाला कॉलेज जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मोतीवाला कॉलेज भागात सोमवारी दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. त्यामुळे पाटील मदतीला धावून गेले असता ही घटना घडली. दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या दाम्पत्यासह त्यांच्या मुलांना उचलण्यात मदत केल्याने या ठिकाणी असलेल्या अनोळखी महिलेसह तिच्या साथीदारांनी गर्दी जमवून पाटील व त्यांच्या आईस मारहाण केली.
या घटनेत दगड विटांसह रॉडने मारहाण करण्यात आल्याने मायलेक जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.