नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतनगर भागात कौटूंबिक वादातून जावयास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत सास-याने पकडून ठेवत शालकाने आपल्या मेव्हण्याच्या पोटात धारदार चाकू खुपसला असून या घटनेत जावई गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ वजीर अन्सारी व मोहम्मद आसिफ अन्सारी (रा. भारतनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बापलेकाचे नावे आहेत. याबाबत रेहान महेबुब पठाण (रा.नानावली भद्रकाली) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार पठाण यांचा मोठा भाऊ मोईन मेहबुब पठाण (रा.म्हाडा बिल्डीग,भारतनगर) याचे संशयित सासरे व शालक असून, त्यांच्यात कौटूंबिक वाद आहे. या वादातून सोमवारी (दि.७) रात्री ही घटना घडली.
मोईन पठाण सोमवारी रात्री विनयनगर येथील देवीमंदिर परिसरातील वत्सलाभा अपार्टमेंट भागात असतांना संशयित बापलेकाने त्यास गाठून कौटुंबिक वादातून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी भाऊ मोईन पठाण याने संशयितांच्या ताब्यातून सुटका करून घेत बचावासाठी पलायन करण्याचा प्रयत्न केला असता त्यास एकाने पकडून ठेवून दुस-याने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या घटनेत पोटावर चाकू खुपसण्यात आल्याने मोईन पठाण हा जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वाघ करीत आहेत.