नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कॉलेजरोड भागातील नामांकित कंपनीचे शोरूम फोडून भामट्यांनी तब्बल पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ९१ हजाराच्या रोकडसह, शुज कपडे व अन्य वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत महेश मिश्रा (रा.हिरावाडीरोड, पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिश्रा कॉलेजरोड भागातील पुमा शोरूमचे काम बघतात. रविवारी (दि.५) रात्री अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे शटर तोडून ही चोरी केली. शोरूममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील ९१ हजाराची रोकड, सुमारे ९ लाख १८ हजार ३८८ रूपये किमतीचे २५६ नग शुज तसेच ६ लाख ८६ हजार ९५१ रूपये किमतीचे ३३७ नग टी शर्ट, जॅकेट, ट्रंक आणि शॉट पॅण्ट, तसेच ८१ हजार २६७ रूपये किमतीचे ५९ नग पुमा कंपनीची अॅक्सेसरिज त्यात बॅग, सॉक्स, कॅप,बॉटल आणि वॉलेटचा समावेश आहे. या घरफोडीत चोरट्यांनी १६ लाख ८५ हजार ६०६ रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार करीत आहेत.