नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी कंबर कसले असून, टवाळखोरांना पिटाळून लावत गुन्हेगारांचीही सर्वत्र शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. सर्च ऑपरेशन मोहितमेत सहा तडिपारांसह सणोत्सवाच्या पार्श्वभूमिवर वास्तव्यास मनाई करण्यात आलेल्या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई वेगवेगळया भागात करण्यात आली असून याप्रकरणी अंबड मुंबईनाका, देवळाली कॅम्प उपनगर, भद्रकाली व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूपीत उर्फ गोपीबलदेव देवल (२७ रा. घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड),संदिप मारूती गायकवाड (इंदिरागांधी वसाहत क्र.१ लेखानगर सिडको सध्या गणेश कॉलनी श्रमिकनगर), सलीम उर्फ बाबा युसूफ शेख (३६ रा. गुलशननगर वडाळागाव),रोहित अशोक गायकवाड (३० रा.लहवित देवळाली कॅम्प), बबलू रामधर यादव (२८ रा.सुंदरनगर देवळालीगाव), शोहेब सादिक शेख (रा.जिपीओ रोड,पिंपळचौक भद्रकाली) व शिवाजी उर्फ बाळा पोपट गांगुर्डे (२८ रा.महारूद्र अपा.सावरकरनगर), असे तडिपार कारवाईचे व मनाई आदेशाचे उलंघन करणा-या संशयितांची नावे आहेत. सहा संशयितांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पोलीसांनी त्यांच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे.
शहर व जिह्यातून त्यांना तडिपार केलेले असतांनाही त्यांचा वावर शहरातच होता. पोलीस त्यांच्या मागावर असताना ते वेगवेगळय़ा भागात राबविलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये मिळून आले. तर सणोत्सवाच्या पार्श्वभूमिवर उपद्रव टाळण्यासाठी दि.२१ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान शहरात वास्तव्यास मनाई करण्यात आलेले शिवाजी गांगुर्डे हे आपल्या घर परिसरात मिळून आले.