नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या काही दिवसात वेगवेगळया भागात राहणारे चार मुले बेपत्ता झाले आहेत. त्यात दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. सदर मुलांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी म्हसरूळ, अंबड, भद्रकाली व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मखमलाबाद येथील सिध्दार्थ राजवाडा येथे राहणारा अल्पवयीन मुलगा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी (दि.१) दुपार पासून अचानक तो गायब झाला असून त्यास कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
दुसरा प्रकार जुने नाशिक परिसरातील नाईकवाडीपुरा भागात घडला. शपरीची तालीम भागात राहणारा अल्पवयीन मुलगाही बुधवार (दि.१) पासून बेपत्ता असून त्याचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज बांधला जात आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत. तिसरा प्रकार सिडकोतील पाटीलनगर भागात घडला. पाटील नगर येथील अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि.१) रात्री पासून बेपत्ता झाली आहे. तिलाही कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा दावा कुटूंबियांनी केला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार फुलपगारे करीत आहेत.
तर नाशिकरोड येथील सुभाषरोड भागात राहणारी मुलगी मंगळवार (दि.३०) पासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने कुटूंबियानी पोलीसात धाव घेतली असून तिला कुणी तरी पळवून नेल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.