नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन स्टॉक मार्केट मध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्तास साडे चार लाख रूपयांना गंडा घातला. तीन महिने उलटूनही मुद्दलीसह नफ्याची रक्कम पदरात न पडल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश विष्णू क्षत्रिय (रा.महात्मानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. क्षत्रिय सेवानिवृत्त असून, गेल्या ऑगष्ट महिन्यात भामट्यांनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला होता. ऑनलाईन स्टॉक मार्केट ट्रेंडिगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. या ग्रुपमधील आमिषाला बळी पडलेल्या क्षत्रिय यांना वेगवेगळया्
बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.
अवघ्या काही दिवसातच क्षत्रिय यानी चार लाख ५० हजार रूपयांची गुंतवणुक केली. मात्र तीन महिने उलटूनही पैसे पदरात न पडल्याने त्यांनी भामट्यांशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत करीत आहेत.