नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कपड्यांच्या खरेदी नंतर पैसे ऑनलाईन दिल्याचा फेक मॅसेज दाखवून भामट्या ग्राहकांनी दोन व्यावसायीक महिलांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. वेगवेगळया भागात घडलेल्या या घटनांमध्ये व्यावसायीकांना साडे दहा हजार रूपयांना गंडविण्यात आले असून याप्रकरणी मुंबईनाका व नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील तान्हाबाई तुकाराम सांगळे (रा.पाटीलनगर त्रिमुर्तीचौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सांगळे यांचे तिडके कॉलनीतील सोपान हॉस्पिटल भागात अवंती कलेक्शन नावाचे लेडीज गारमेंट आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास त्या आपला व्यावसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका ग्राहकाने त्यांच्या दुकानातून सहा हजार २०० रूपये किमतीचे सहा लेडीज थ्री पिस खरेदी केले. ऑनलाईन पैसे देत असल्याचे सांगून त्याने साडे सहा हजार रूपये अदा केल्याचे भासविले. त्यामुळे सांगळे यांनी त्यास ३०० रूपयेही परत केले. मात्र कालांतराने पैसे जमा झाले नाही असे लक्षात आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गोडे करीत आहेत.
याच प्रकारची दुसरी घटना सामनगाव रोड भागात घडली. पुंडलिक बाळू मानकर (रा.जय भगवती संकुल,सामनगावरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मानकर यांचे आपल्या घर परिसरात फॅशन पाईट नावाचे कापड दुकान आहे. गेल्या १३ ऑगष्ट रोजी सायंकाळच्या सुमारास मानकर यांच्या पत्नी व्यवसाय सांभाळत असतांना अनोळखी ग्राहकाने दुकानातून सुमारे पाच हजार रूपये किमतीचे सात लेडीज ड्रेस खरेदी केले. याबदल्यात त्याने ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा केला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.