नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– झोपण्याच्या जागेवर लघूशंका केली या कारणातून दोन भिका-यांमध्ये झालेल्या वादात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना महामार्गावरील वडाळानाका येथील उड्डाणपुला खाली झाली. या घटनेने शहरातील भिका-यांचा प्रश्न चर्चेत आला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश दिपक रायबहाद्दूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, या घटनेत बंडू लक्ष्मण गांगुर्डे (३५ मुळ रा.बाºहे ता. सुरगाणा हल्ली उड्डाणपूलाखाली वडाळानाका) या युवकाची हत्या करण्यात आली आहे. याबाबत आक्की बंडू गांगुर्डे या महिलेने फिर्याद दिली आहे. मोलमजूरी करणारे गांगुर्डे दाम्पत्य काही दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळा नाका भागातील उड्डाणपुलाखाली वास्तव्यास आहे. भिक मागून अथवा मोलमजूरी करून आपला उदनिर्वाह भागवत होते. शुक्रवारी (दि.२६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास पती पत्नी पुलाखाली जेवणाची तयारी करीत असतांना ही घटना घडली.
दोघे जण चुलीवर स्वयंपाक करीत असतांना काही अंतरावर रायबहाद्दूर दांम्पत्याच्या झोपण्याच्या जागेवर लघूशंका करतांना आढळून आला. यावेळी बंडू गांगुर्डे उठून त्यास समजावण्यास गेले असता ही घटना घडली. लघूशंका करण्यास विरोध केल्याने संतप्त जयेश रायबहाद्दूर याने रागाच्या भरात बंडू गांगुर्डे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी पत्नी अक्काबाईने आरडाओरड करीत वेळीच धाव घेतल्याने संशयिताने धुम ठोकली.
गंभीर जखमी झालेल्या बंडू गांगुर्डे यास अन्य भिकारींच्या मदतीने रात्री घरगुती (गावठी) औषधोपचार करण्यात आला. रात्रभर तसेच झोपून ठेवत सकाळी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तश्रावाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार यादव डंबाळे करीत आहेत. मुंबईनाका भागात सध्या नवरात्रोत्सवामुळे ग्रामदैवत कालिका माता यात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे महामार्गाच्या उड्डाणपूलाखाली व शहरातील विविध सिग्नल भागात भिका-यांची रेलचेल आहे. दिवसभराच्या कमाईतून बहुतांश भिकारी हे दिवस रात्र अमली पदार्थाच्या नशेत तल्लीन झालेले दिसतात त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.