नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार खरेदी विक्रीत एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत कारमालकाने पोलीसात धाव घेतली असून खरेदीदाराने बँकेचे हप्ते न भरता विक्री करारनामाचे उल्लघंन केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पुरूषोत्तम गोसावी, प्रितम चांगले, विकास चौधरी व राकेश सोनार आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष अशोक वाळुंज (रा.राजगड सोसा. मोटवाणी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. वाळुंज यांच्या मालकीच्या एमएच १७ सीआर २५२६ या कारचा गेल्या मार्च महिन्यात संशयितांनी व्यवहार केला होता. साडे सात लाख रूपयांमध्ये हा कार विक्रीचा व्यवहार निश्चीत करण्यात आला होता. पाच लाख रूपयांचे वाहन कर्ज फेडण्याची हमी घेत संशयितांनी विक्री करारनामा करून घेतला होता.
यावेळी टोकन म्हणून एक लाख रूपये अदा करण्यात आले आहे. दोन दिवसांनी उर्वरीत रक्कम देण्याची ग्वाही देत संशयितांनी दीड लाखाचा धनादेश दिला होता. मात्र संशयितांनी बँकेचे वेळेवर हप्ते भरले नाही. तसेच संगनमत करून व्यवहारातील उर्वरीत रक्कमही दिली नसल्याने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.