नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याने एका गावगुंडाने ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, ग्रामसेवकाने सुटका करून घेत पोलीसांशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे जिल्हयात गेल्या काही वर्षापूर्वी घडलेल्य अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत कांड घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान बाळू जाधव (रा.लाखलगाव ता.जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नरेंद्र सखाराम शिरसाठ (४८ रा. हिरावाडी पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. शिरसाठ लाखलगाव येथे ग्राम पंचायत अधिकारी पदावर कार्यरत असून, गुरूवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात नेहमीप्रमाणे शासकीय कामकाज करीत असतांना ही घटना घडली. ग्रामपंचायत कर्मचारी रोशन खैरनार व गणेश वलवे यांच्यासमवेत ते कामकाज करीत असतांना संशयित समाधान जाधव याने ग्रामपंचायत कार्यालय गाठले. अवैध व्यवसाय बंद करण्याच्या ठराबाबाबत विचारणा करण्यासाठी त्याने थेट शिरसाठ यांच्या केबिनमध्ये प्रवेश करीत त्यांना दमदाटी केली. समाधानचे गावात उपहारगृह असून त्यात तो दारूविक्रीचा व्यवसाय करतो. समाधान याच्या हातात पेट्रोल भरलेली बाटली होती. शिरसाठ यांच्या केबिनचा दरवाजा लोटून आमचे अवैध व्यवसाय का बंद केले म्हणून जाब विचारले. त्याचेवळी संशयिताने शिरसाठ यांच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल फेकले व शिवीगाळ करू लागला.
टेबलवर असलेले पेपरवेट उलचून काच टेबलवरील काच फोडला तसेच कागदपत्रे शिरसाठ यांच्या अंगावर फेकली. या गदारोळाचा आवाज ऐकून काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत धाव घेत समाधान यास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बचावासाठी शिरसाठ त्यांच्या केबिनमधून बाहेर पडत असताना समाधानने शिरसाठ यांच्या पोटात लाथ मारली तसेच शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सोबत आणलेली काडीपेटी काढत शिरसाठ यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. कशीबशी सुटका करून शिरसाठ यांनी पोलिसांना फोन केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी झालेल्या झटापटीत शिरसाठ यांच्या खांद्यास मोठी दुखापत झाली असून पोलीसांनी तात्काळ धाव घेत संशयितास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगदाळे करीत आहेत.