नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कंपनीच्या आउटलेटबाबत माहिती देण्यासाठी पीडितेस दुकानात बोलावून घेत टोळक्याने डांबून ठेवत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मेन रोड भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कपील गोसावी, ज्योती देवरे, साक्षी देवरे, मयुर जुन्नरे व मयूर भालेराव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. पीडिता गुरूवारी (दि.२५) आपल्या घरी असतांना तिला संशयितांनी तिला मेनरोड येथील ऋतूराज प्लाझा या इमारतीत असलेल्या कुलस्वामीनी कॉस्मटीक या दुकानात बोलावले.
दुपारी दोनच्या सुमारास ती दुकानात गेली असता ही घटना घडली. दुकान मालक कपील गोसावी व अन्य संशयितांनी दुकानाचा दरवाजा लावून घेत महिलेस अश्लिल शिवीगाळ व मारहाण केल्याची तसेच कुटुंबियांना बोलावून घे नाही तर सोडणार नाही अशी धमकी देत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आई व बहिणीला यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी पोलीसाना गाठून महिलेची सुटका करून घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.