नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड भागातील दारूदुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह मद्यावर डल्ला मारला. या घटनेत गल्यातील दोन हजाराच्या रोकडसह दारू साठा असा सुमारे ६५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पदमाकर चव्हाण (रा.ओंकार रेसि.मोतीवाला कॉलेजमागे ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण यांचे पेठरोडवरील ओंकारानगर भागात संतोष बिअर अॅण्ड वाईन शॉपी असून या ठिकाणी ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.२४) रात्री बंद दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केली.
दुकानात शिरलेल्या भामट्यांनी गल्यातील दोन हजाराच्या रोकडसह लॅपटॉप व बिअरच्या बाटल्या असा सुमारे ६४ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.