नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विमान तिकीट खरेदी विक्रीत नामांकित चौधरी यात्रा कंपनीस गंडविणा-या संगमनेरच्या भामट्यास शहर पोलीसांच्या गुंडा विरोधी पथकाने पुण्यात बेड्या ठोकल्या. संशयिताने ४६ विमान तिकीटे बनावट पाठविल्याने यात्रा कंपनीस सहल रद्द करण्याची वेळ आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेजस शशिकांत वैष्णव (३१ रा.संगमनेर जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी फिर्याद दिली होती. नामांकित चौधरी यात्रा कंपनी प्रा.लि. च्या वतीने गेल्या जानेवारी महिन्यात मुंबई ते दुबई या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ५० यात्रेकरूंनी या सहलीत सहभाग नोंदवित कंपनीकडे आगावू रक्कम जमा केली होती. १६ ते २० जानेवारी दरम्यान ही यात्रा पार पडणार होती. कंपनीच्या वतीने ५० यात्रेकरूंच्या विमान तिकीट सेवेची जबाबदारी संगमनेर येथील माईल स्टोन हॉलीडेज प्रा.लि. या कंपनीकडे सोपविली होती. त्याबदल्यात चौधरी यात्रा कपंनीने संशयित संचालक तेजस वैष्ण यास १० लाख ८२ हजार ५०० रूपयांची रक्कम ऑनलाईन अदा केली होती.
संशयितानेही अल्पावधीत चौधरी यात्रा कंपनीस ५० प्रवाश्यांसाठी एअर इंडिया व इंडिगो विमानाचे तिकीटे पाठविले होते. यात्रा कंपनी समवेत प्रवाश्यांनी १६ जानेवारी रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले असता तिकीटे बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दुबई येथे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात निघाल्याला प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. विमानतळाच्या सिस्टीममध्ये चार खरे तर ४६ विमान तिकीटे बनावट असल्याचे समोर आल्याने सर्वांना धक्का बसला होता. या प्रकाराने यात्रा कंपनीची बदनामी झाली. तसेच ऐनवेळी यात्रा रद्द करण्यात आल्याने मोठा आर्थीक भुर्दंड सहन करावा लागला होता.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयिताने १९ लाख ८२ हजार रूपयांची फसवणुक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयिताच्या मागावर असतांना पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तेजस वैष्णव हा माईल स्टोन हॉलीडेज कंपनीचे पुणे येथून कामकाज करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने पुणे गाठून परदेशात जाण्यासाठी तिकीट विक्री करणा-या यात्रा कंपनीच्या माध्यमातून माग काढत संशयितास बानेर पोलीस ठाणे हद्दीत बेड्या ठोकल्या असून त्यास सायबर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे,सुनिल आडके, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे व सुनिता कवडे आदींच्या पथकाने केली.
…………