नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एम.डी. या अमली पदार्थाची विक्री करणा-या दोघांना पोलीसानी बेड्या ठोकल्या. जुना सायखेडा रोड भागात संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी मुंबईतून विक्रीसाठी अमली पदार्थ आणल्याचे तपासात पुढे आले आहे.
सौरभ दिगंबर महाले (रा.गुरूकूल सोसा.पाण्याच्या टाकी समोर लोकमान्य हॉस्पिटल) व कौस्तूभ उर्फ अमृत धनंजय इखनकर (रा.निरमणी पार्क, दुर्गा मदिराजवळ नारायण बापू नगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून इर्शाद चौधरी आणि फहाव हे त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत अंमलदार प्रतिक देवरे यांनी फिर्याद दिली आहे. जुना सायखेडा रोड भागात एमएच १५ डीडब्ल्यू ७९२३ या दुचाकीवर एमडी प्लेडर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) या भागात सापळा लावण्यात आला होता.
संशयित दुर्गा माता मंदिर परिसरातील क्वॉलिटी मेन्स पार्लर समोर थांबताच पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांच्या अंगझडतीत सुमारे ५.५ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आढळून आला असून त्यांच्या ताब्यातील दुचाकी, मोबाईल व अमली पदार्थ असा सुमारे १ लाख १८ हजार १०० रूपये किमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.