नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनैतिक संबधाच्या संशयातून अपहरण करून परप्रांतीय तरूणास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना निगळ वाईन शॉप भागात घडली होती. संशयितामध्ये दोघा पोलीस रेकॉर्डवरील सराईतांचा समावेश असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप अलोक लाल उर्फ बाबू मुक्तार मनियार (२८ रा. इंदिरा विकासनगर,राजवाडा देवळाली गाव), गणेश राजाराम पगार (३५ रा.आण्णाभाऊ साठे नगर देवळाली गाव) व विजय राजेंद्र औचित्ये (३५) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. याबाबत पंकज बन्सीलाल तेली (मुळ रा.राजस्थान हल्ली निगळ वाईन शॉफ मागे,सातपूर) या युवकाने फिर्याद दिली आहे. संशयितांपैकी एकाच्या पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयातून टोळक्याने गुरूवारी (दि.१८) पंकज तेली यास त्याच्या घरी गाठून बेदम मारहाण केली. यावेळी त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने एमएच १५ बीडी ९४५१ या चारचाकीत बळजबरीने बसवून अपहरण केले.
यावेळी संशयितांनी तेली यांच्या खिशातील पाकिट व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. तसेच देवळालीगाव येथील एका रूममध्ये डांबून ठेवत बाहेर पडण्यास प्रतिबंध केला. या ठिकाणी लाकडी धोपटण्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करीत तेली यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले असून या घटनेची गंभीर दखल घेत सातपूर व उपनगर पोलीसांनी संयुक्त शोध मोहिम राबवित तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.