नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जादा परताव्याचे अमिष दाखवत दिग्दर्शक असलेल्या एका तरुणाची साडेपाच लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. परताव्यासह मुद्दल पदरात न पडल्याने दिग्दर्शकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत अशोक सोनजे (रा. ओमकार गॅरेज समोर मखमलाबाद रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजाचे नाव आहे. याबाबत युवराज प्रदीप जाचक (रा. लोनकर मळा, जय भवानी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. युवराज जाचक दिग्दर्शक असून त्यांच्या मित्राच्या ओळखीतून त्यांची संशयित संकेत सोनजे याच्याशी ओळख झाली होती. सोनजे हे संकेत एंटरप्रायझेस नावाने आधार सेवा केंद्र आणि विविध आर्थिक पोर्टल्सच्या माध्यमातून व्यवसाय करीत असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. संशयित सोनजे याने विश्वास संपादन करीत ‘पे वन’ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १५ टक्के परतावा मिळतो असे आमिष दाखवून जाचक यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. एप्रिल २०२५ मध्ये कालिदास कला मंदिर परिसरात झालेल्या भेटीत गुंतवणुक करण्याबाबत बोलणी झाल्याने ही फसवणुक झाली. संशयिताने गुंतवणुकीबाबतचे आवश्यक कागदपत्रे आणि दोन कोरे धनादेश देऊन विश्वास संपादन केल्याने जाचक यांनी वेगवेगळ्या तारखांना आरटीजीएस, फोन पे आणि रोख स्वरूपात मिळून ५ लाख ५० हजारांची रक्कमअदा केली.
कालांतराने चांगला परतावा मिळत नसल्याने जाचक यांनी आपली रक्कम परत मागितली असता संशयित याने जाचक यांना १ लाख २८ हजारांची रक्कम परत दिली. मात्र, उर्वरित रक्कम जाचक यांनी वेळोवेळी मागून देखील दिली नाही. त्यामुळे जाचक यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीसात धाव घेतली असन सोनजे याने याप्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.