नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मुलींपाठोपाठ अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढले असून वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुलांसह एक मुलगी बुधवार (दि.१७) पासून बेपत्ता झाली आहे. सदर मुलांना कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी अंबड, उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबड औद्योगीक वसाहतीत राहणारी मुलगी बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या पालकांबरोबर खालचे चुंचाळे भागातील एका वर्क शॉपवर गेली होती. पालक आपल्या कामाचा पगार घेण्यासाठी गेले असता वर्क शॉप बाहेर उभी असलेली मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविल्याने याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
दुसरी घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील पांडवनगरी भागात घडली. गुरूगोविंद सिंग कॉलेज मागे राहणारा १५ वर्षीय मुलगा बुधवार पासून बेपत्ता आहे. त्यास कोणी तरी फुस लावून कुठे तरी पळवून नेल्याचा आरोप कुटूंबियांनी केल्याने याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.
तिसरी घटना नाशिक पुणे मार्गावरील गांधीनगर भागात घडली. १२ वर्षीय मुलास बुधवारी त्याच्या पालकांनी नेहमी प्रमाणे शाळेत सोडले होते. सायंकाळी तो घरी न परतल्याने कुटूंबियांनी शाळेत जावून चौकशी केली असता तो दुपारनंतर शाळेत उपस्थीत नसल्याचे कळाले. त्यामुळे कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता परंतू तो मिळून आला नाही. त्यास कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.