नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाविद्यालयीन तरूणीवर एका परिचीताने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लॅकमेल करीत सलग दीड वर्षापासून सुरू असलेला परिचीताचा अत्याचार वाढल्याने युवतीने पोलीसात धाव घेतले असून, या घटनेची गंभीर दखल घेत पथकाने संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश राजेंद्र कोठावदे (२५ रा.शाहिर लेन,कळवण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणा-या पीडित युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून, त्यांच्यात २०१८ पासून ओळख आहे. दोघेही एकत्र शिक्षण घेत होते. मात्र कालांतराने युवती पुढील शिक्षणासाठी नाशकात वास्तव्यास आली असता कोठावदे वारंवार तिच्या संपर्कात राहिला.
२०२४ मध्ये संशयिताने तरूणीस चारचाकीतून पाथर्डी फाटा येथील हॉटेल हेवन सेवन व हॉटेल करी लिव्ह येथे नेवून ब्लॅकमेल करीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. सलग दीड वर्षापासून संशयिताकडून अत्याचार सुरू असून अतिरेक वाढल्याने तिने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सपना पुरी करीत आहेत.