नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रूम पार्टनर झोपी गेल्याची संधी साधत परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून घेत पोबारा केल्याची घटना घटना सिडकोतील भजबळ फार्म भागात घडली. या घटनेत भामट्याने चाळीस हजार रूपयांची रोकड लांबविली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश कुमार चव्हाण (२२ मुळ रा. मकरा जैनपूर उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भामट्याचे नाव आहे. याबाबत सत्यम रविंद्र मौर्य (२१ रा.भुजबळ फार्म जवळ, बडदेनगर सिडको) या युवकाने फिर्याद दिली आहे. उत्तरप्रदेश येथील संशयित चव्हाण व तक्रारदार मौर्य हे एकमेकांचे रूमपार्टनर असून ते सिडकोतील बडदेनगर भागात वास्तव्यास आहेत.
मौर्य मंगळवारी (दि.१६) रात्री आपल्या रूममध्ये झोपी गेला असता ही घटना घडली. संशयिताने मौर्य याच्या बॅगेत असलेली ४० हजाराची रोकड परस्पर काढून पोबारा केला. ही घटना दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आल्याने मौर्य याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.