नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरातील साफ सफाई करण्याचा बहाणा करून मालकाच्या दागिण्यांवर नोकर असलेल्या दांम्पत्याने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तब्बल साडे सहा लाख रूपयांचे अलंकार भामट्यांनी लांबविले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छींद्र मुरलीधर अहिरे व स्वाती मच्छींद्र अहिरे (रा.दोघे शिवशक्तीचौक सिडको) अशी मालकाच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या भामट्या दांम्पत्याचे नाव आहे. याबाबत उत्तम बापुराव पवार (रा.सप्तशृंगी कॉलनी जुना गंगापूर नाका) यांनी फिर्याद दिली आहे. पवार कुटूंबियाकडे अहिरे दांम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून घरकामगार म्हणून कामास आहेत. जानेवारी २०२४ ते ५ मे २०२५ दरम्यान संशयितांनी ही चोरी केली.
या काळात साफसफाईचा बहाणा करून दांम्पत्याने बंगल्याच्या दुस-या मजल्यावरील मास्टर बेड रूममधील कपाटात ठेवलेल्या २१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ३० ग्रॅम वजनाची चांदीची पुजेची पळी अशा सुमारे ६ लाख ४८ हजार रूपये किमतीच्या अलंकारावर डल्ला मारला. ही बाब नुकतीच उघडकीस आल्याने पवार यांनी पोलीसात धाव घेतली असून, अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.