नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मैत्रिणीशी लग्न का केले या कारणातून टोळक्याने एका तरूणाचे अपहरण करीत लुटल्याची घटना त्र्यंबकरोड भागात घडली. या घटनेत भामट्यांनी दमदाटी करीत तरूणाच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीश शिंगोटे (रा.तुळजाभवानी चौक,सिडको), शैलेश उर्फ बंटी कुवर, अक्षय पवार व त्यांचे चार ते पाच साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत तेजस ज्ञानदेव घाडगे (२४ रा. मोतीवाला कॉलेजसमोर,त्र्यंबकराजनगर ध्रुवनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार घाडगे याने गिरीश शिंगोटे याच्या पूर्वीच्या मैत्रीणीशी विवाह केल्याने हे अपहरण नाट्य घडले.
घाडगे बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास आपल्या घर परिसरात असतांना एमएच ०६ एएस ५५१७ या कारमधून आलेल्या टोळक्याने त्यास बळजबरीने आपल्या कारमध्ये बसविले. कारमध्ये टोळक्याने शिवीगाळ व दमदाटी करीत मैत्रीणीशी का विवाह केला याबाबत जाब विचारला. त्र्यंबकरोडवरील हिंद सोसायटीसमोर भामट्यांनी घाडगे याच्या खिशातील महागडा मोबाईल बळजबरीने काढून तसेच कारखाली उतरून देत पोबारा केला. घाडगे याने कसेबसे सातपूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राकेश न्हाळदे करीत आहेत.