नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्याजासह मुद्दल परत करण्यासाठी घरी गेलेल्या कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवत सावकाराने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत डबल रकमेची मागणी करीत मुजोर सावकाराने कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने कर्जदाराने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणाने खासगी सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सावकारी विरोधी कायदा तसेच शस्त्रबंदीचे उलंघन आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास मैंद, रवी सोळसे व चारचाकीचा अनोळखी चालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संदिप भास्कर गायकर (३५ रा.नांदगाव बु. ता. इगतपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. गायकर यांनी आर्थीक अडचणीमुळे कैलास मैंद या सावकाराकडून दीड लाख रूपये व्याजाने घेतले होते. संशयिताच्या तगाद्यामुळे गायकर यांनी जमवाजमव करून गेल्या २२ जून रोजी दुपारी जेलरोड येथील हरिविहार सोसायटीमधील संशयिताचे कार्यालय गाठले असता ही घटना घडली.
व्याजासह मुळ मुद्दल परत करण्यासाठी गेलेल्या गायकर यांना सावकार कैलास मैंद व रवी सोळसे यांनी दमदाटी करीत व बंदूकीचा धाक दाखवित बळजबरीने आपल्या सफेद रंगाच्या चारचाकीतून एकलहरा येथील राखेच्या परिसरात नेले. या ठिकाणी शिवीगाळ व दमदाटी करीत गायकर यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे साडे तीन लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास कुटुंबियासह जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने गायकर यांनी पोलीसात धाव घेतली आहे. संशयित कैलास मैंद याच्यावर यापूर्वीही सावकारीचे गुन्हे दाखल असून पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक तपास निरीक्षक संजीव फुलपगारे करीत आहेत.