नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत एकाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला त्रास असह्य झालेल्या मुलीने आपल्या कुटूंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर चव्हाण (रा.ब्राम्हणवाडे ता. सिन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टवाळखोराचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. मुलगी परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षा पासून संशयित तिला त्रास देत असून, शाळा ते घर पाठलाग करीत तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
संशयिताचा अतिरेक वाढल्याने अखेर मुलीने आपल्या कुटूंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.








