नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दोघांनी महिलेच्या गळयातील पट्टीपोत हिसकावली. ही घटना रामवाडी भागात घडली. या घटनेत सुमारे ४० हजाराच्या सोन्याच्या पोतीवर भामट्यांनी डल्ला मारला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी नारायण नायक (वय ६५, रा. श्रद्धा पार्क, आदर्श नगर, रामवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नायक खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. शुक्रवारी (दि.१२) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान कामकाज उरकून त्या घरी परतल्या असता ही घटना घडली. नायक इमारतीतील आपल्या सदनिकेत दळणाचा डबा व पिशवी ठेवत असतानाच पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात संशयितांनी त्यांना भाडेकरूच्या पत्ता विषयी चौकशी केली व पिण्यासाठी पाणी मागितले. नायक यांनी पाणी दिल्यानंतर रिकामा ग्लास परत देत असताना एका संशयिताने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची पट्टी पोत खेचली.
यावेळी नायक यांनी प्रतिकार करीत एकास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, दुस-याने त्यांच्या हातावर बुक्का मारत दोघांनी धूम ठोकली. या घटनेत सोन्याच्या पोतीचा सुमारे ४० हजार रूपये किमतीचा अर्धा तुकडा घेवून भामट्यांनी पोबारा केला असून ही घटना इमारतीतील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.