नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-चेकिंग सुरू असल्याची बतावणी करीत तोतया पोलीसांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिणे हातोहात लांबविल्याची घटना चिचोली गावाजवळ घडली. पतीस बोलण्यात गुंतवून व महिलेस मदतीचा बहाणा करीत भामट्यांनी हात की सफाई केली असून, या घटनेत सुमारे ६० हजाराच्या अलंकारावर भामट्यानी डल्ला मारला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिजाबाई सोपान भिसे (५७ रा. मोहू ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. भिसे दांम्पत्य शुक्रवारी (दि.१२) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास ते दुचाकीने डबलसिट घराकडे परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली. नाशिक पुणा मार्गावरून दाम्पत्य प्रवास करीत असतांना चिंचोली गावाजवळील उड्डाणपूलावर थांबलेल्या दोघांनी त्यांची वाट अडविली.
खोटे पोलीस आयकार्ड दाखवून भामट्यांनी पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे, अंगावरील सोन्याचांदीचे दागिणे काढून ठेवा नाही तर दंड भरावा लागेल असे सल्ला दिला. यावेळी एकाने महिलेच्या पतीस बोलण्यात गुंतविले तर दुसºयाने मदतीच्या बहाण्याने महिलेचे सुमारे ६० हजार रूपये किमतीचे दागिणे हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.