नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत प्रवाश्यांच्या दागिण्यांवर डल्ला मारणारी अहिल्यानगर येथील चोरट्यांच्या सराईत टोळीच्या ग्रामिण पोलीसांनी मुसक्या आवळल्या. कारमधून येत हात की सफाई करून पसार होणा-या या टोळीतील दोघांना बेड्या ठोकत पोलीसांना दोन महिलांनाही नोटीस बजावली असून त्यांच्या अटकेने जिल्हाभरातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
बाळासाहेब चंद्रभान राक्षे (५५ रा.चांदनगर बेलापूर ता. श्रीरामपूर) व दिगंबर सुर्यभान दारकुंटे (५६ रा.सलाबतपुर ता. नेवासा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दिंडोरी बसस्थानकात गेल्या मंगळवारी (दि.२६) ही घटना घडली होती. बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी वृध्द महिलेच्या गळया्यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलीस संयुक्तरित्या तपास करीत असतांना सीसीटिव्ही यंत्रणा पडताळणी अंती ही टोळी अहिल्यानगर जिह्यातील असल्याचे शिक्कामोर्तब झाले. पथकाने श्रीरामपूर भागातून दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांनी लिलाबाई खंदारे (रा.सलाबपुर ता.नेवासा) व अन्य एका महिलेच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली स्विफ्ट कार व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांना अटक करीत पोलीसांनी संशयित महिलांना नोटीस बजावली आहे. या टोळीतील सदस्य सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात अहिल्यानगर व पुणे जिह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाडेतत्वावरील चारचाकी बसस्टॅण्ड परिसरात पार्क करून ते हात की सपाई करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. संशयितांच्या अटकेने जिह्यातील बसस्थानक आवारात झालेल्या चोºयांचा उलगडा होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई अधिक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र मगर,दिंडोरीचे निरीक्षक रघुनाथ शेगर, एलसीबीचे उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सुदर्शन आवारी,जमादार नवनाथ सानप,अंमलदार विश्वनाथ काकड,दिलीप राऊत,श्रकांत गारूंगे,विनोद टिळे, ललिता शिरसाठ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम,प्रदिप शिंदे,नितीन गांगुर्डे आदींच्या पथकाने केली.