नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुक करणे शहरातील एका महिलेसह तिघांना चांगलेच महागात पडले आहे. गुंतवणुकीवर अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तब्बल सव्वा कोटी रूपयांना गंडविले आहे. गुंतवणूकीची रक्कम व मोबदला पदरात न पडल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या जून महिन्यात शहरातील महिलेसह अन्य तिघांशी भामट्यांनी संपर्क साधला होता. रिया सेहगल,संजय कपूर व त्यांच्या अनोळखी साथीदारानी वेगवेगळया नंबरवरून संपर्क साधत शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले. यानंतर ठकबाजांनी विश्वास संपादन करीत गुंतवणुकदाराना वेगवेगळया बँक खात्यात लाखोंच्या रकमा भरण्यास भाग पाडले.
या घटनेत गुंतवणुकदाराची एक कोटी १५ लाख ३३ हजार ५२९ रूपयांची फसवणुक झाली आहे. काही महिने उलटूनही गुंतवणूकीची रक्कम व मोबदला पदरात न पडल्याने संबधीताने पोलीसात धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.